बघता बघता २०१९ चे वर्ष पण संपत आले. ऑफिस मध्ये अचानक जाहीर केलेल्या सुट्टी मुळे धड काही फिरण्याचा प्लॅन होऊ शकला नाही. मग काय शेवटी बायकोच्या आग्रहा मुळे सासूरवडीतच जाऊन येऊ असं ठरलं. सासुरवाडी पण कुठे तर पनवेल. म्हटलं चला वर्षाच्या शेवटी सासुरवाडीचाच पाहुणचार घेऊन येऊ. तसेपण सासरी जावई गेला म्हणजे जावयाचे थाट असतात. निदान माझे तरी आहेच म्हणा. असो, तो फार वेगळा विषय. पण नुसतं एका जागी बसून अराम करणं म्हणजे निव्वळ वेळ फुकट घालवणे असं माझं मत आहे. कुठेतरी सहज भटकून यायचंच असं मी तरी निश्चित केलं. ट्रेकिंगला जायचं म्हटलं तर बायको सोबत असल्याने कुठे जाऊ शकत नव्हतो. तिला या सगळ्या बद्द्दल प्रचंड राग. कदाचित रोज येत असणाऱ्या अपघाती बातम्यांमुळे तिच्या मनात गिर्यारोहणाबद्दल भीती निर्माण झाली असावी. त्यात तिचा दोष नाही म्हणा. इतक्या कमी वेळात माथेरान किंवा लोणावळा यासारख्या ठिकाणी हॉटेल मध्ये बुकिंग सुद्धा मिळणं खूपच अवघड. तस पाहिलं तर पनवेल वरून लोणावळा दोन तासांचं अंतर आहे आणि एका दिवसात जाऊन येऊन होण्यासारखा प्लॅन आहे. पण शेवटी म्हटलं "लोणावळा काय कधीपण जाऊन येता य...