खूप दिवसांपासून एखादा ट्रेक करण्याचा विचार मनात घोळत होता. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण आडवे येत होते आणि ट्रेकचा बेत पुढे ढकलला जात होता. त्यातच महाराष्ट्रात सध्या प्रचंड उष्णतेची लाट सुरू असल्यामुळे उन्हाळ्यात ट्रेक करायचा की नाही याबाबत मनात थोडी भीतीही होती. कडक ऊन, उष्माघाताचा धोका आणि शरीराची होणारी दमछाक यामुळे ट्रेकिंगपासून दूर राहण्याचाच विचार सुरू होता.
तरीही यावेळी शनिवार-रविवार वाया जाऊ द्यायचा नाही, असे ठरवले. काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या सान्निध्यात वेळ घालवायचा हा निर्धार केला. इंटरनेटवर थोडे संशोधन केल्यानंतर कर्जतजवळील कोंडाणे बौद्ध लेण्यांमार्गे राजमाची किल्ला ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. पनवेल पासून जवळच असल्याने मला हा ट्रेक सोयीचा वाटला.
या ट्रेकसाठी अनेक मित्रांना विचारणा केली. मात्र प्रचंड उकाड्यामुळे कोणीही तयार नव्हते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही काही पोस्ट करून ट्रेकसाठी सोबती शोधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही जणांनी उत्सुकता दाखवली, पण ट्रेकच्या आदल्या दिवशी किंवा शेवटच्या क्षणी सर्वांनी माघार घेतली.
अखेरीस माझ्यासोबत फक्त माझा छोटा मित्र गौरव (इयत्ता ८ वि) तयार झाला. विशेष म्हणजे या ट्रेकसाठी तो माझ्यापेक्षाही जास्त उत्साहित होता. त्याचा उत्साह आणि माझी भटकंतीची ओढ घेऊन आम्ही राजमाचीच्या दिशेने निघालो...
पहाटे ५ वाजताच आमची ट्रेकसाठी तयारी पूर्ण झाली होती. साधारण ५:१५ वाजता आम्ही पनवेलहून कोंडाणे लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या कोंडाणे गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. पहाटेची वेळ असली तरी हवेत गारव्याचा किंचितही स्पर्श नव्हता. वातावरण पूर्णपणे कोरडे आणि उकाड्याने भरलेले होते. सूर्य उगवायच्या आधीच त्याची तीव्रता जाणवत होती.
रस्त्यातील हवामान पाहून क्षणभर मनात शंका आली की आपण हा ट्रेक पूर्ण करू शकू की नाही. पण आता मागे फिरणे शक्य नव्हते. वाटेत कर्जत मध्ये थोडावेळ थांबून पुढील प्रवासासाठी थोडी बिस्किटे घेतली आणि पुरेसे पाणी सोबत असल्याची खात्री करून घेतली. कारण त्या दिवसाचा खरा आधार पाणीच असणार हे आम्हाला आधीच समजले होते.
मस्त बाईक राईड करत सकाळी साधारण ७ वाजता आम्ही कोंढाणे गावात पोहोचलो. जवळच एका रिकाम्या सावलीच्या जागेत बाइक पार्क केली. त्या वेळी गावात विशेष हालचाल दिसत नव्हती. परिसर अगदी शांत होता. मात्र आकाशात चढू लागलेल्या सूर्याने त्याचे इरादे स्पष्ट केले होते. सकाळचे फक्त सात वाजले होते, पण त्याची तीव्रता अशी होती की जणू तो आम्हालाच न्याहारी बनवण्याच्या तयारीत होता! पुढील काही तासांची खरी परीक्षा आता सुरू होणार होती.
गावात पोहोचल्यावर वेळ न दवडता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. खरं तर त्या वेळी तिथे वेळ घालवण्यासाठी काहीच नव्हतं. ना चहाची टपरी, ना नाश्त्याची सोय, ना कुठली गर्दी. परिसर पूर्णपणे शांत आणि निवांत होता. आमच्यासाठीही ही जागा पूर्णपणे नवीन होती, त्यामुळे पुढे काय अनुभव येणार याची उत्सुकता होती.
सुरुवातीची वाट अगदी स्पष्ट आणि सोपी होती. काही अंतर चालल्यानंतर एक तुटलेले कुंपण दिसले आणि त्यातून आत जाणारी पायवाट आम्ही पकडली. त्यानंतर आम्ही सतत पुढे चालत राहिलो. सुरुवातीला आमचा वेगही चांगला होता आणि आम्ही कमी वेळात बरेच अंतर पार केले.
मात्र कोंडाणे लेण्यांच्या अगदी जवळ येऊन एक अनपेक्षित अडचण निर्माण झाली. आम्ही पूर्णपणे वाट चुकलो होतो! समोर दिसणाऱ्या अनेक छोट्या पायवाटा आणि दाट झाडीमुळे नेमकी दिशा कोणती हेच समजत नव्हते. काही क्षणांसाठी आम्हाला आपण नेमके कुठे जात आहोत याचीच कल्पना उरली नव्हती.
अशा वेळी घाबरून जाण्यापेक्षा शांत राहणे महत्त्वाचे असते. आम्ही घाई न करता आजूबाजूचा परिसर नीट निरखला आणि ज्या ठिकाणी चुकीचे वळण घेतले होते तिथे परतलो. विशेष म्हणजे त्या वेळी आसपास अक्षरशः कोणीही नव्हते. मार्गदर्शन करण्यासाठी एकही व्यक्ती दिसत नव्हती. त्यामुळे स्वतःच्या निरीक्षणशक्तीवरच विश्वास ठेवावा लागला.
थोडा वेळ शोधाशोध आणि निरीक्षण केल्यानंतर अखेर योग्य पायवाट सापडली. आणि काही मिनिटांतच आमच्या समोर कोंडाणे लेण्यांचे भव्य आणि सुंदर दर्शन झाले. ट्रेक सुरू केल्यापासून अवघ्या अर्ध्या तासात आम्ही या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलो होतो. वाट चुकल्यामुळे निर्माण झालेला ताण क्षणात नाहीसा झाला आणि समोर उभ्या असलेल्या त्या प्राचीन बौद्ध लेण्यांनी सारा थकवा विसरायला लावला.
कोंडाणे लेण्यांसमोर उभे राहिल्यावर काही क्षण आम्ही फक्त त्या वास्तूकडे पाहत राहिलो. सह्याद्रीच्या कातळात कोरलेल्या या प्राचीन बौद्ध लेण्या पाहताना त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याचे आणि चिकाटीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या लेण्या आजही इतिहासाच्या साक्षीदाराप्रमाणे अभिमानाने उभ्या आहेत.
लेण्यांच्या सभोवतालचा परिसर अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात इथे कोसळणारे धबधबे आणि हिरवाई प्रसिद्ध असली तरी उन्हाळ्यातही या जागेचे वेगळेच आकर्षण जाणवते. उंच कातळ, दाट जंगल आणि त्यामध्ये दडलेल्या या लेण्या एखाद्या गुप्त खजिन्यासारख्या भासतात.
मुख्य चैत्यगृहातील कोरीवकाम, दगडात घडवलेले खांब आणि वास्तूची रचना पाहताना त्या काळातील बौद्ध भिक्षूंचे जीवन कसे असेल याची कल्पना मनात उभी राहते. इतक्या दुर्गम ठिकाणी, आधुनिक साधनसामग्री नसताना अशी भव्य निर्मिती उभारली गेली, हीच गोष्ट थक्क करून सोडते.
लेण्यांमध्ये थोडा वेळ घालवून आम्ही परिसर शांतपणे न्याहाळला. सकाळची वेळ असल्याने तिथे आमच्याशिवाय फारसे कोणी नव्हते. त्यामुळे त्या जागेची शांतता आणि ऐतिहासिक वातावरण अधिकच अनुभवता आले. काही फोटो काढले, थोडी विश्रांती घेतली आणि पुढील प्रवासासाठी स्वतःला तयार केले.
आता खरी चढाई आमची वाट पाहत होती. कोंडाणे लेण्या हा आमच्या राजमाची ट्रेकचा फक्त पहिला टप्पा होता. समोर उभे असलेले डोंगर आणि त्यांच्यामध्ये हरवणारी पायवाट पाहून आम्हाला पुढील आव्हानांची जाणीव झाली. पाण्याचा एक घोट घेतला, बॅग खांद्यावर चढवली आणि राजमाचीच्या दिशेने पुन्हा एकदा पावले टाकायला सुरुवात केली.
लेण्यांमधील शांत वातावरणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. आता आमच्या समोर होता राजमाचीकडे जाणारा मुख्य ट्रेक. सुरुवातीला वाट जंगलातून जात होती. उंच झाडांमुळे काही प्रमाणात सावली मिळत होती, त्यामुळे चालणे तुलनेने सोपे वाटत होते. पक्ष्यांचा आवाज आणि जंगलातील शांतता यामुळे वातावरण प्रसन्न होते, पण आम्हाला माहीत होते की हा आराम फार काळ टिकणार नाही.
थोड्याच वेळात जंगल विरळ होऊ लागले आणि बऱ्यापैकी ऊन जाणवू लागले. सकाळचे अवघे काही तास झाले होते, पण उन्हाची तीव्रता जाणवत होती. घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि प्रत्येक काही मिनिटांनी पाण्याची बाटली हातात जात होती. या ट्रेकमध्ये सर्वात मोठे आव्हान चढाई नव्हते, तर वाढत जाणारा उकाडा होता.
सुदैवाने गौरवचा उत्साह अजूनही तसाच कायम होता. वाटेत एखादा मोठा दगड, एखादे झाड किंवा दूर दिसणारा डोंगर याबद्दल तो उत्सुकतेने बोलत होता. त्याचा तो निरागस उत्साह पाहून मलाही नवचैतन्य मिळत होते. अनेकदा ट्रेकमध्ये शारीरिक ताकदीपेक्षा सोबत असणाऱ्या व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा ठरतो, आणि त्या दिवशी ते आम्हाला प्रकर्षाने जाणवत होते.
आम्ही निवांत पण सातत्यपूर्ण वेगाने पुढे जात राहिलो. मागे वळून पाहिले की कोंडाणे परिसर हळूहळू लहान होत चालला होता. सभोवताली पसरलेले सह्याद्रीचे डोंगर, उन्हामुळे निर्माण झालेली धूसरता आणि दूरवर दिसणाऱ्या रांगा एक वेगळेच दृश्य निर्माण करत होत्या. सोबतच समोर दूरवरून डोंगरातून जाणारी ट्रेन दिसत होती आणि आम्हाला लांबूनच आवाज देत होती.
या ट्रेकची एक गोष्ट विशेष जाणवत होती—एकांत. आजकाल लोकप्रिय ट्रेक्सवर नेहमीच गर्दी असते. पण त्या दिवशी आम्हाला सकाळी फक्त दोन लोक्स भेटले आणि ते सुद्धा फक्त कोंढाणे लेण्यापर्यंतच. संपूर्ण जंगलात आम्ही दोघेच भटके उरले होतो. त्या शांततेत प्रत्येक पावलाचा आवाज, वाऱ्याची हलकी झुळूक आणि निसर्गाचे सूक्ष्म स्वर अधिक स्पष्टपणे ऐकू येत होते.
उन्हाची झळ वाढत असली तरी आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. प्रत्येक वळणानंतर राजमाची जवळ येत असल्याची भावना आम्हाला पुढे जाण्यास प्रेरणा देत होती. समोर अजून किती अंतर बाकी आहे याची फारशी चिंता न करता आम्ही एकच गोष्ट ठरवली होती—हळूहळू का होईना, पण आज राजमाची गाठायचीच.
या ट्रेकमध्ये एक गोष्ट विशेष लक्षात राहिली ती म्हणजे काही अज्ञात पण देवदूतासारख्या ट्रेकर्सनी केलेली मदत. संपूर्ण मार्गावर झाडांना रंगीत रिबिनी बांधलेल्या होत्या. जंगलात वाट चुकण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी या रिबिनी आमच्यासाठी Google Maps पेक्षाही जास्त विश्वासार्ह ठरत होत्या. ज्यांनी या रिबिनी बांधल्या आहेत, त्यांना मनापासून सलाम! कारण त्या नसत्या तर आम्ही कदाचित अजूनही एखाद्या झाडाशी चर्चा करत योग्य मार्ग शोधत बसलो असतो.
साधारण अर्धा ट्रेक पूर्ण झाल्यावर आम्ही थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरवले. एका झाडाच्या सावलीत बसलो, बिस्किटांचे पाकीट उघडले आणि पाण्याच्या बाटलीकडे अशा नजरेने पाहिले जणू ते सह्याद्रीतील शेवटचे उरलेले पाणी होते. उन्हाने आमची चांगलीच परीक्षा घेतली होती आणि त्या काही घोटांनी आम्हाला नवसंजीवनी दिली.
विश्रांती घेत असताना आजूबाजूच्या जंगलातील पक्ष्यांचा सुरेल गजर कानावर पडत होता. सह्याद्रीतील जंगलांमध्ये आढळणारे रानकोतवाल, बुलबुल, सनबर्ड, टेलरबर्ड आणि कदाचित मलबार व्हिसलिंग थ्रश यांसारखे पक्षी आसपास असावेत. त्यांच्या आवाजांनी संपूर्ण जंगल जिवंत वाटत होते. अर्थात आम्हाला पक्ष्यांची नावे तेव्हा माहीत नव्हती. आमच्यासाठी ते दोनच प्रकारचे आवाज होते—"हा पक्षी असेल" आणि "हा पण बहुतेक पक्षीच असेल!"
विशेष म्हणजे त्या पक्ष्यांची ऊर्जा पाहून थोडा हेवाही वाटत होता. आम्ही सावलीत बसून दम काढत होतो आणि ते मात्र आरामात एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत मैफिल रंगवत होते. त्यांना आमची अवस्था पाहून हसू येत असेल तर त्यात त्यांची काही चूक नव्हती.
थोडा आराम, काही बिस्किटे आणि भरपूर पाणी यांचा आधार घेत आम्ही पुन्हा पुढे निघालो. राजमाची अजून दूर होती, सूर्य अजून तापत होता, आणि आमच्या चेहऱ्यावरील घाम स्पष्ट सांगत होता की या ट्रेकची खरी मजा अजून बाकी आहे.
भरपूर पाणी पिऊनही आमची अवस्था काही फार सुधारली नव्हती. उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त होता की शरीरातील ऊर्जा अक्षरशः निघून जात असल्यासारखी वाटत होती. प्रत्येक चढाईनंतर काही क्षण थांबून श्वास सावरणे भाग पडत होते.
दरम्यान, गौरवने त्याच्या बाटलीतील पाणी जवळजवळ संपवले होते. आता त्याच्या नजरा माझ्या बाटलीवर खिळल्या होत्या. जणू काही मी पाण्याची बाटली नाही, तर सह्याद्रीतील शेवटचा खजिनाच घेऊन चाललो होतो!
हा त्याचा पहिलाच मोठा ट्रेक असल्यामुळे ट्रेकमध्ये पाण्याचे महत्त्व त्याला अजून पूर्णपणे समजले नव्हते. विशेषतः अशा ट्रेकमध्ये, जिथे पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पाण्याचा एकही खात्रीशीर स्रोत नाही. अनुभवी ट्रेकरला माहित असते की ट्रेकमध्ये पाणी हे फक्त पेय नसते, तर ते जीवनविमा पॉलिसीसारखे असते.
ट्रेक सुरू करण्यापूर्वीच मी त्याला अनेकदा सांगितले होते, "पाणी जपून वापर. तहान लागली म्हणून प्रत्येक वेळी अर्धी बाटली संपवायची नसते." पण सकाळच्या उत्साहात त्याने त्या सल्ल्याकडे फारसे लक्ष दिले नसावे.
आता मात्र परिस्थिती बदलली होती. प्रत्येक काही मिनिटांनी त्याची नजर माझ्या बाटलीकडे वळत होती आणि मी ती लगेच बॅगेच्या दुसऱ्या बाजूला सरकवत होतो. शेवटी मी त्याला गंभीरतेने बोलून गेलो "गौरव बाळ, एकवेळ मेलो तरी चालेल पण वरची वाडी गाठेपर्यंत पाणी संपवू नकोस!" (अर्थातच गमतीचा भाग).
त्या क्षणी आम्ही दोघेही हसलो, पण त्या वाक्यामागचं वास्तव मात्र खूप खरं होतं. कारण सह्याद्रीत अनेक गोष्टींची तडजोड करता येते, पण पाण्याची नाही. आणि त्या दिवशी सूर्यदेव आमची ही शिकवण पुन्हा पुन्हा पक्की करून देत होते.
कोंडाणे लेण्यांपासून उधेवाडीपर्यंतचा ट्रेक तसा अवघड नाही. मार्गात काही ठिकाणी दाट जंगल लागते, जिथे झाडांची सावली आणि गारवा उन्हाच्या तडाख्यातून मोठा दिलासा देतात. त्या सावलीत चालताना वाटत होते की निसर्गाला आमची दया आली असावी. पण हा आनंद फार काळ टिकत नसे. काही मिनिटांतच जंगल संपायचे आणि पुन्हा एकदा निळे आकाश, तळपता सूर्य आणि आमची परीक्षा सुरू व्हायची.
आम्ही सकाळी साधारण साडेआठ वाजता कोंडाणे लेण्यांमधून पुढचा प्रवास सुरू केला होता. सुरुवातीला वाटले होते की वेळेत उधेवाडी गाठू. पण उन्हामुळे, मधल्या विश्रांतींमुळे आणि आमच्या पाण्याशी सुरू असलेल्या "राष्ट्रीय बचत अभियानामुळे" वेग थोडा कमी झाला. अखेर साधारण साडेअकराच्या सुमारास आम्ही उदेवाडी गावात पोहोचलो.
म्हणजे जवळपास एक तास उशीर झाला होता. आणि गंमत म्हणजे ट्रेक अजून संपला नव्हता! मनोरंजन किल्ला अजून आमच्या डोक्यावर उभाच होता आणि त्याची चढाई बाकी होती. हे लक्षात येताच आमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. शरीर म्हणत होते, "बस आता!" आणि मन म्हणत होते, "आता इथपर्यंत आलोच आहोत तर पुढे जाऊया."
उधेवाडी जवळ करताच आम्हाला खूप वेळानंतर पहिला माणूस दिसला. इतका वेळ जंगलात, पायवाटांवर आणि डोंगरांमध्ये फिरत होतो की एखादा माणूस दिसल्यावर क्षणभर वाटले आपण पुन्हा सभ्यतेत परत आलो आहोत. त्या क्षणी एखाद्या गावकऱ्याला पाहून जितका आनंद झाला, तितका कदाचित किल्ला पाहूनही झाला नसता!
समोरच एक छोटंसं घर दिसलं. घरच, पण त्याचबरोबर घरगुती खानावळही. ते दृश्य पाहून आम्ही कोणतीही बैठक न घेता, कोणतेही मतदान न करता आणि कोणतीही चर्चा न करता एकमताने निर्णय घेतला—"इथेच थांबायचं!"
घरमालक अतिशय मनमिळाऊ निघाले. त्यांनी आमची चौकशी केली, कुठून आलात, किती वाजता निघालात, कोणत्या मार्गाने आलात हे विचारले. जेव्हा त्यांना कळलं की आम्ही कोंडाणे गावातून चालत आलो आहोत आणि तेही या भर उन्हात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अगदी स्पष्ट सांगत होता—"हे लोक ट्रेकर्स आहेत की सूर्याशी वैयक्तिक वैर असलेले योद्धे?"
गावकरी आपल्या कामात व्यस्त दिसत होते. कुठे कोणी कुंपणच काम करतोय, कोणी दुपारच्या जेवणाची तयारी तर कोणी लहान मुले त्यांचा खेळात रमली होती. गाव निवांत वाटत होते. थोड्याच वेळात काही गावकरीही तिथे जमले. त्यांनीही आमच्याबद्दल विचारपूस केली. कोंडाणेमार्गे या उकाड्यात ट्रेक करून आल्याचं ऐकल्यावर त्यांनी आमचं कौतुक केलं. खरं सांगायचं तर त्या क्षणी आम्हाला एखादा पुरस्कार मिळाल्यासारखंच वाटलं. कारण त्या परिस्थितीत दोन कौतुकाचे शब्द आणि थंड पाण्याचा एक ग्लास यांची किंमत एखाद्या ट्रॉफीपेक्षा कमी नव्हती.
काही वेळ सावलीत बसून विश्रांती घेतली. शरीराला थोडा आराम मिळाला, पण मनोरंजन किल्ला अजूनही वरून आमच्याकडे पाहत होता. जणू तो म्हणत होता, "आराम झाला असेल तर या आता, खरी भेट अजून बाकी आहे!"
गावात पोहोचल्यावर सर्वात आधी मी काकांना एक लिंबूपाणी मिळेल का अशी विचारणा केली. खरं तर त्या क्षणी आम्हाला लिंबूपाणी नको होतं, तर थेट जीवनदान हवं होतं! सकाळपासूनच्या उन्हात आणि ट्रेकमध्ये आमची अवस्था चांगलीच झाली होती. पोटात कावळे ओरडत नव्हते, तर बहुतेक गरुडांनीच तळ ठोकला होता.
त्यामुळे कोणताही विचार न करता आम्ही घरगुती पिठलं-भाकरीची ऑर्डर दिली. तोपर्यंत थोडी विश्रांती घ्यायची ठरवली. काही वेळातच समोर आलेले थंडगार लिंबूपाणी पाहून डोळ्यांत अक्षरशः चमक आली. पहिला घोट घेताच असे वाटले की स्वर्गातून थेट अमृतच पाठवले आहे. त्या परिस्थितीत त्याची चव वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील.
सोबत मिळालेली ताजी काकडीही अप्रतिम होती. पूर्णपणे सेंद्रिय, कुरकुरीत आणि उन्हात भाजलेल्या आमच्या शरीरासाठी एखाद्या नैसर्गिक एसीसारखी. त्या काकडीने आणि लिंबूपाण्याने आम्हाला पुन्हा माणसांच्या श्रेणीत आणले.
थोडा वेळ आराम करताना नकळत डुलकीही लागली. शरीराला त्याची नितांत गरज होती. आणि मग आला तो क्षण ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो—गरमागरम पिठलं-भाकरी!
पहिला घास घेताच आम्ही एकमेकांकडे पाहिलं. शब्दांची गरज नव्हती. त्या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर एकच भावना होती—"यासाठीच तर आपण इथपर्यंत आलो आहोत!" साधं पण मनापासून बनवलेलं ते जेवण अक्षरशः स्वर्गीय लागलं. शहरातील कितीही महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तरी ट्रेकनंतर मिळणाऱ्या अशा पिठलं-भाकरीची सर कुणालाच येणार नाही.
जेवण झाल्यावर आमची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. सकाळचे थकलेले, तहानलेले आणि भाजलेले ट्रेकर्स आता तृप्त, शांत आणि सावलीत बसलेले तत्त्वज्ञानी झाले होते. इतके की काही क्षणांसाठी आम्ही गंभीरपणे विचार केला—"इथूनच परत फिरायचं का? किल्ला उद्याही इथेच असणार आहे!"
पण मग दुसरा विचार आला. एवढं अंतर चालत आलो, एवढं ऊन सहन केलं, इतकं पाणी वाचवत वाचवत इथपर्यंत पोहोचलो... आणि आता किल्ला न पाहताच परत जायचं? सह्याद्री आमची खिल्ली उडवेल!
उधेवाडी गावाच्या वर उभा असलेला मनोरंजन किल्ला हा राजमाची किल्ल्याच्या जुळ्या बालेकिल्ल्यांपैकी एक. दुसरा म्हणजे श्रीवर्धन किल्ला. या दोन्ही किल्ल्यांनी शतकानुशतके बोरघाट आणि आसपासच्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. आजही या किल्ल्यांवर उभे राहिले की त्यांच्या रणनीतिक स्थानाची कल्पना येते.
मनोरंजन किल्ल्याची चढाई तुलनेने लहान आणि सोपी आहे. त्यामुळे पोटभर पिठलं-भाकरी खाल्ल्यानंतरही आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो. अर्थात, त्या क्षणी आमच्या शरीराने काही वेगळे मत व्यक्त केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही!
माथ्यावर पोहोचल्यावर सभोवताली पसरलेले सह्याद्रीचे दृश्य अप्रतिम दिसत होते. दूरवर डोंगररांगा, खाली उधेवाडी गाव आणि भोवतालचा निसर्ग पाहत काही वेळ निवांत घालवला. इतक्या उन्हातही त्या ठिकाणचे सौंदर्य मनाला भुरळ घालत होते.
माथ्यावरून समोरच श्रीवर्धन किल्ला स्पष्ट दिसत होता. सुरुवातीला त्यालाही भेट द्यावी असा विचार मनात आला. पण मग आम्ही आमच्या शरीराची अवस्था आणि घड्याळातील वेळ या दोन्ही गोष्टींचा प्रामाणिक आढावा घेतला.
शरीर म्हणत होते, "बस झालं, आता पुरे!"
घड्याळ म्हणत होतं, "दुपारचे बारा वाजून गेलेत."
आणि सूर्य म्हणत होता, "अजून माझी शिफ्ट संपलेली नाही."
या तिघांचे एकमत झाल्यामुळे आम्हीही शहाणपणाचा निर्णय घेतला आणि श्रीवर्धन किल्ला पुढच्या वेळेसाठी राखून ठेवला. काही ठिकाणे मुद्दाम अपूर्ण ठेवावीत, म्हणजे पुन्हा सह्याद्रीत परत येण्यासाठी एक कारण कायम राहते.
काही फोटो, थोडी भटकंती आणि भरपूर आठवणी गोळा करून आम्ही मनोरंजन किल्ल्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. दुपारचे ऊन मात्र आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते, त्यामुळे जास्त वेळ थांबणे शहाणपणाचे नव्हते.
म्हणून नेमके दुपारी १ वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती, पण एक गोष्ट नक्की होती—दुपारच्या उन्हात उतरणे हे सकाळच्या चढाईपेक्षा जास्त संस्मरणीय ठरणार होते!
मनोरंजन किल्ल्यावरून खाली उतरायला आम्हाला अवघे पंधरा मिनिटे लागली. वर चढताना वाटले होते की खरी परीक्षा झाली आहे, पण नंतर समजले की सह्याद्रीने अजून प्रश्नपत्रिका वाटलीच नव्हती!
उदेवाडीत परत आल्यावर आम्ही पुन्हा एकदा पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. त्या क्षणी पाणी म्हणजे आमच्यासाठी लक्झरी नव्हती, तर जगण्यासाठीची मूलभूत गरज होती. काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही कोंडाणेकडे उतरण्यास सुरुवात केली.
दुपारचे साधारण एक वाजले होते आणि सूर्यदेव त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत होते. सकाळी जे ऊन वाटत होते ते आता फक्त ट्रेलर होते, आणि मुख्य चित्रपट सुरू झाला होता.
उतरणीला सुरुवात करून अर्धा तासही झाला नसेल, पण आमची अवस्था पुन्हा बिकट झाली. दुपारच्या कडक उन्हात उतरण्याचा घेतलेला निर्णय आता आमच्या विरोधात साक्ष देत होता. प्रत्येक वेळी एखादी छोटी सावली दिसली की आम्ही तिथे थांबत होतो. अगदी दोन फूट सावली असली तरी आम्ही तिचा वापर पाचतारांकित रिसॉर्टसारखा करत होतो.
विशेष म्हणजे सकाळी ज्यांनी आम्हाला आनंद दिला होता ते जंगलातील पक्षी अजूनही उत्साहाने गात होते. सकाळी त्यांचे सूर जणू आम्हाला प्रोत्साहन देत होते. पण आता त्याच आवाजांचा अर्थ वेगळाच वाटत होता. जणू ते म्हणत होते, "काय मग फिटली का हौस?"
रस्त्यात एक माकडांचा समूहही दिसला. त्यांनी काही सेकंद आमच्याकडे पाहिले आणि आम्ही त्यांच्याकडे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी स्पष्ट होते—"या उकाड्यात फिरायला बाहेर पडण्याइतकी माणसांची बुद्धी कमी असते का खरंच?" त्या क्षणी त्यांच्या प्रश्नाला आमच्याकडेही उत्तर नव्हते.
गौरवची परिस्थिती तुलनेने बरी होती. कदाचित त्याच्या तरुण उत्साहाने अजून हार मानली नव्हती. पण माझी अवस्था मात्र दिवसेंदिवस खालावत चालली होती. प्रत्येक दोन-तीन मिनिटांनी मला थांबावे लागत होते. श्वास सावरणे, पाणी पिणे आणि पुन्हा चालायला सुरुवात करणे, एवढाच दिनक्रम झाला होता.
एका क्षणी तर मनात आले, "बस! आता इथेच तंबू टाकून राहायला सुरुवात करूया." शरीरातील ऊर्जा संपत आली होती. त्यात माझे ट्रेकिंग शूजही माझ्याविरुद्ध बंड पुकारून बसले होते. प्रत्येक पाऊल टाकताना पाय दुखत होता.
शेवटी एका ठिकाणी थांबून मी डावा पाय तपासला. आणि तेव्हा खरी समस्या समोर आली. पायाला शू-बाइट झाला होता आणि अंगठ्याचे नखही थोडेसे उचलले गेले होते. चालणे आता फारच अवघड झाले होते. त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावरचा भाव असा होता की जणू ट्रेकमध्ये मला एखादा दुर्मिळ पुरस्कार मिळाला आहे!
अर्थात, माझ्याकडे फर्स्ट एड किट नव्हते. बँडेज नव्हते. औषध नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आसपास माणूसही नव्हता. जंगल, डोंगर, ऊन आणि आम्ही दोघे—इतकीच आमची टीम उरली होती.
मग सुरू झाला जुगाड विभाग. जे काही उपलब्ध होते त्याचा वापर करून पायाला थोडासा आराम मिळेल अशी व्यवस्था केली. त्यानंतर मोठमोठे ब्रेक घेत, स्वतःला समजावत आणि प्रत्येक वळणावर "बस, आता जवळ आलो" असे खोटे आश्वासन देत आम्ही पुढे सरकत राहिलो.
अखेरीस अनेक तासांच्या संघर्षानंतर दुपारी साधारण चार वाजता आम्ही कोंडाणे लेण्यांपर्यंत पोहोचलो. त्या क्षणी लेण्या पाहून जेवढा आनंद झाला, तेवढा कदाचित सकाळीही झाला नव्हता.
आणि मग अचानक आशेचा किरण दिसला.
कोंडाणे लेण्यांजवळ एक ट्रेकिंग ग्रुप नुकताच पोहोचला होता. इतका वेळ निर्जन जंगलात फिरल्यानंतर एकाच वेळी इतके लोक पाहून आम्हाला जवळपास सभ्य समाजात परतल्यासारखे वाटले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आता कदाचित कोणाकडे फर्स्ट एड किट असेल, बँडेज असेल किंवा निदान माझ्या पायाची अवस्था पाहून दोन सहानुभूतीचे शब्द तरी मिळतील!
त्या क्षणी ते ट्रेकर्स आम्हाला एखाद्या रेस्क्यू टीमपेक्षा कमी वाटत नव्हते.
कोंडाणे लेण्यांजवळ पोहोचल्यावर मी त्या ट्रेकिंग ग्रुपमधील काही जणांना फर्स्ट एड किट किंवा बँडेजबद्दल विचारणा केली. सुदैवाने त्यांच्या ट्रेक लीडरकडे व्यवस्थित फर्स्ट एड किट होते. त्या क्षणी ते मला ट्रेक लीडर कमी आणि डॉक्टर जास्त वाटत होते!
त्यांनी अतिशय आपुलकीने माझ्या पायाची पाहणी केली आणि प्राथमिक उपचार केले. थोडासा आराम मिळाल्यावर माझा आत्मविश्वास परत यायला लागला. कारण त्याआधी प्रत्येक पाऊल टाकताना माझा पाय आणि मेंदू यांच्यात गंभीर वाद सुरू होता.
उपचार सुरू असतानाच आमच्या गप्पाही रंगल्या. बोलता बोलता कळलं की हा संपूर्ण ग्रुप खास हैदराबादहून फक्त राजमाची ट्रेकसाठी आला होता. हे ऐकून क्षणभर मला सह्याद्रीचा अभिमान वाटला. आपण ज्या डोंगररांगांमध्ये सहज भटकतो, त्याच डोंगरांचे आकर्षण लोकांना शेकडो किलोमीटर दूरून खेचून आणते, ही भावना खूप छान होती.
थोडा आराम आणि उपचारांनंतर माझा पाय "ठीक" झाला होता. अर्थात, ट्रेकरच्या भाषेत "ठीक" म्हणजे दुखत नाही असे नाही; तर "आता चालता येईल इतपत दुखत आहे" असा त्याचा अर्थ असतो.
संध्याकाळी नेमके पाच वाजता आम्ही पायथ्याजवळ पोहोचलो. दूरवर आमची पार्क केलेली बाइक दिसू लागली. सामान्य परिस्थितीत बाइक दिसली की माणूस वेगाने चालायला लागतो. पण त्या दिवशी माझ्या शरीराने वेगळाच निर्णय घेतला होता. बाइक अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असतानाही मी अजून एक ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
कारण त्या शेवटच्या पाच मिनिटांचे अंतर मला जवळजवळ एव्हरेस्ट मोहिमेच्या अंतिम टप्प्यासारखे वाटत होते!
काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर अखेर आम्ही बाइकपर्यंत पोहोचलो. हेल्मेट घालताच गौरवने मला एक स्पष्ट आदेश दिला—"आता मध्ये कुठेही थांबायचं नाही. सरळ घरी!"
त्याच्या आवाजात विनंती नव्हती, चर्चा नव्हती, लोकशाही नव्हती. तो थेट आदेश होता.
आणि खरं सांगायचं तर मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत होतो.
सकाळपासून उन्हाशी लढत, पाण्याचे गणित सांभाळत, शू-बाइटशी झुंजत आणि स्वतःच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही दोघेही पुरते थकलो होतो. त्यामुळे बाइक सुरू केली आणि मग कुठेही न थांबता थेट घराचा रस्ता धरला.
संध्याकाळी साधारण सात वाजता आम्ही घरी पोहोचलो.
दारातून आत पाऊल टाकताना एक गोष्ट मात्र निश्चित झाली होती—हा ट्रेक शारीरिकदृष्ट्या कितीही कठीण असला, तरी पुढच्या काही दिवसांत त्याच ट्रेकबद्दल अभिमानाने सांगताना आम्ही उन्हाचा, थकव्याचा आणि पायाच्या वेदनेचाही विसर पडणार होता.
कारण प्रत्येक ट्रेकरला माहित असते...
ट्रेक संपल्यावर दुःख कमी होतं, पण कथा अधिक रंगतदार होत जाते!
Comments
Post a Comment