Skip to main content

छोटेखानी भटकंती - कर्नाळा पक्षी अभयारण्य - कर्नाळा किल्ला

बघता बघता २०१९ चे वर्ष पण संपत आले. ऑफिस मध्ये अचानक जाहीर केलेल्या सुट्टी मुळे धड काही फिरण्याचा प्लॅन होऊ शकला नाही. मग काय शेवटी बायकोच्या आग्रहा मुळे सासूरवडीतच जाऊन येऊ असं ठरलं. सासुरवाडी पण कुठे तर पनवेल. म्हटलं चला वर्षाच्या शेवटी सासुरवाडीचाच पाहुणचार घेऊन येऊ. तसेपण सासरी जावई गेला म्हणजे जावयाचे थाट असतात. निदान माझे तरी आहेच म्हणा. असो, तो फार वेगळा विषय. पण नुसतं एका जागी बसून अराम करणं म्हणजे निव्वळ वेळ फुकट घालवणे असं माझं मत आहे. कुठेतरी सहज भटकून यायचंच असं मी तरी निश्चित केलं.
ट्रेकिंगला जायचं म्हटलं तर बायको सोबत असल्याने कुठे जाऊ शकत नव्हतो. तिला या सगळ्या बद्द्दल प्रचंड राग. कदाचित रोज येत असणाऱ्या अपघाती बातम्यांमुळे तिच्या मनात गिर्यारोहणाबद्दल भीती निर्माण झाली असावी. त्यात तिचा दोष नाही म्हणा. इतक्या कमी वेळात माथेरान किंवा लोणावळा यासारख्या ठिकाणी हॉटेल मध्ये बुकिंग सुद्धा मिळणं खूपच अवघड. तस पाहिलं तर पनवेल वरून लोणावळा दोन तासांचं अंतर आहे आणि एका दिवसात जाऊन येऊन होण्यासारखा प्लॅन आहे. पण शेवटी म्हटलं "लोणावळा काय कधीपण जाऊन येता येईल". तितक्यात एक विचार मनात येऊन गेला,  तो म्हणजे आपण पनवेल ला असून एखादी छोटेखानी ट्रेक तर करूच शकतो. पनवेल म्हटलं कि इथून आजूबाजूच्या २५ एक किलोमीटर पर्यंत खूप सारे ट्रेकिंग स्पॉट आहेत. ट्रेक ला जाणारी बरीच मंडळी आधी पनवेल ला पोहचून नंतर मग पुढचा पल्ला गाठतात. मी सुद्धा कित्येक ट्रेक साठी आधी पनवेल ला येऊन गेलोय.
कुटुंबा सोबत ट्रेक किंवा भटकंती करायची म्हटली तर आधी विचार येतो तो कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा किल्ल्याचा. पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असणारा कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य म्हणजे नवीन आणि हौशी गिर्यारोहींसाठी हक्काचे ठिकाण.
आधी म्हटलं
 " कर्नाळा किल्ला? इतका सोप्पा ट्रेक ? तो पण मी? " छे!
 पण मग विचार केला कि चला, फुल ना फुलाची पाकळी . कर्नाळा तर कर्नाळा. बायकोला सोबत यायला कसबस तयार केलं. सोबत तिचा लहान भाऊ प्रणय सुद्धा यायला तयार झाला (झाला काय मीच केला तयार त्याला.) तसही फक्त ऐकून होतो कर्नाळा किल्ल्या बद्दल पण कधी जाणं झालं नाही. येता जाता सहज कर्नाळ्याच्या त्या सुळक्यावर नजर जायची. म्हटलं करू कधीतरी. आज शेवटी योग आलाच म्हणायचा.
कर्नाळा किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्या मधून जावं लागतं. कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेल स्टेशन पासून फक्त १३ किमी लांब आहे. पनवेल स्टेशन वरून टमटम किंवा रिक्षाने सहज पोचता येतं, स्वतःची गाडी असल्यास उत्तमच. पनवेल वरून वडखळ ला जाताना मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच डाव्या बाजूला अभयारण्याचे  प्रवेशद्वार दिसते.


कर्नाळा किल्ला हा इसवी सन १४०० पूर्वी देवगिरि यादवनी बांधला असावा असा अंदाज आहे. त्यानंतर हा तुग़लक़ राज्य कर्त्यांच्या अधिपत्याखाली गेला. कर्नाळा हि त्यांची उत्तर कोकण प्रांतातील जिल्ह्यांची राजधानी असावी असा अंदाज आहे. नंतर तो गुजरातच्या सुलतानांच्या  अधिपत्याखाली आला आणि इसवी सन १५४० मध्ये अहमदनगर च्या सुलतानांनी तो काबीज केला. अगदीच हल्लीचा इतिहास सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सण १६७० मध्ये हा किल्ला मुघलांकडून काबीज केला. महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेब ने यावर कब्जा केला. कालांतराने पेशवे आणि नंतर इंग्रजांचा किल्ल्यावर ताबा राहिला. कर्नाळा किल्याचे भौगोलिक स्थान आणि त्याची बनावट बघता याचा वापर मुख्यत्वे आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा. जैत रे जैत या मराठी सिनेमात याच किल्ल्याचा आसपास चित्रीकरण झाले आहे असे मी ऐकून होतो.
सकाळी ६ वाजता उठून सुद्धा निघायला ८:३० वाजलेच. पनवेल स्टेशन पश्चिमेला जाऊन तिथून एसटी साठी थोडा वेळ वाट पाहिली शेवटी कंटाळून वडाप करून कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळ पोहोचलो तेव्हा सकाळचे ९:३० झाले होते. प्रवेश द्वाराजवळ बरीच गर्दी होती, शाळा कॉलेज मधले बरेच  विद्यार्थी जमले होते. काही हौशी ग्रुप सुद्धा दिसत होते. प्रवेश शुल्क रुपये ५०/- प्रति व्यक्ती भरून आम्ही आत गेलो. वन विभाग आणि महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या पर्यटकांची बरीच चांगली सोय केली आहे. दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांसाठी सशुल्क जागा उपलब्ध आहे. तसेच अभयारण्यात स्वछ आणि सोयीस्कर प्रसाधन गृहांची व्यवस्था पाहून समाधान वाटलं. पावसाळ्यात मात्र इकडच्या व्यवस्थेचा आणि स्वछतेचा बोजवारा उडत असणार हे नक्की. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गिर्यारोहण ठिकाणांची पावसाळ्यातली सध्य स्तिथीत हीच अवस्था आहे.
पावसाळ्यात येणारी पर्यटकांची गर्दी तसेच त्यात स्त्रिया आणि मुलींचा असलेला भरणा पाहता प्रशासनाने येते कपडे बदलण्या साठी आणि आंघोळीसाठी सुद्धा व्यवस्था केली आहे.
आम्ही आत शिरल्याबरोबर लगेचच थोडं पुढे असलेल्या टपरी वजा हॉटेल मध्ये चमचमीत मिसळपाव चा नाश्ता केला. कर्नाळा पक्षी अभयारण्यात शिरताच आपल्याला ऐकू येते ते म्हणजे विविध पक्ष्यांचे सुमधुर आवाज. उगाचच बघण्याचा प्रयन्त केला पण आवाज कुठून आणि कुठल्या पक्ष्यांचे येत होते ते काही समजले नाही. या विषयाचा आणि आपला दूर दूर पर्यंत काही संबंध नसल्याने जास्त डोक्याला त्रास देणे म्हणजे तेंडुलकर ने कबड्डी खेळण्यासारखे. अजून थोडे पुढे गेल्यास पिंजऱ्यात बंद ठेवलेले मोर, ससे, पोपट असे थोडेफार पक्षी आणि प्राणी दिसले. जास्त वेळ नं दवडता येताना बघू म्हणून आम्ही किल्याच्या दिशेने वाटेला लागलो. वन विभागाने मार्गदर्शक फलक लावलेला आहे, त्यानुसार चाल सुरु झाली. वाट तशी अगदीच सोप्पी, एखादा एकटाच माणूस फिरत आला तरी वाट चुकणार नाही अशीच आहे. सुरुवातीला काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर खडकाळ वाट लागते ती पार केल्यावर सरळ मळलेली वाट आहे. येथे चालताना एक गोष्ट मात्र फार चांगली आहे ती म्हणजे इथला झाडोरा, जो कडक उन्हापासून आपले रक्षण करत असतो. जवळपास ७०% ट्रेक दरम्यान हा झाडोरा आपली साथ देतो.
पावसाळ्यात इथे निसर्गदेवतेचे रूप फार सुंदर असणार यात शंका नाही. काही ठिकाणी विश्रांती साठी शेड उभारले आहेत. विचार आला कि असे शेड प्रत्येक ट्रेक मध्ये मिळाले तर ? पण जाऊदे नाहीत ते बरे आहे, उगाच नको ती सवय नको लागून घ्यायला.


किल्ल्याच्या थोडा आधीच पायथ्याशी कर्नाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिराजवळील थोड्याफार वीरगळ न्याहाळल्या आणि  पुढे जाऊ लागलो.
थंडगार हवेचा मनमुराद आनंद घेत, मनसोक्त फोटोग्राफी करत एक दीड तासाने किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्यावर पोहोचताच सर्वात आधी लक्ष जात ते म्हणजे किल्ल्याच्या दरवाजावर. कदाचित हल्लीच त्या दरवाचे काम केलेले असावे नाहीतर इतक्या चांगल्या अवस्थेत असलेले किल्ल्यांचे दरवाजे फार कमी पाहायला मिळतात. टोकेरी शूळ असलेले दरवाजे आपल्याला इतिहासात घेऊन जातात. कदाचित याच दरवाजातून आपले मावळे येत जात असतील. शत्रूंना रोखण्यासाठी दरवाजावर अणुकुचीदार शूळ बसवण्यात आले असावेत असे अनेक विचार मनात घोळत राहतात.

किल्ल्याची बरीचशी पडझड झालेली आहे तरीसुद्धा किल्ला बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यावरील टाक्यांचे निरीक्षण केले पण पाणी बरेच दूषित झाले आहे. किल्ल्यावरील सुळक्यावर चढण्यासाठी कुठून वाट आहे का ते पाहू लागलो परंतु तशी कुठलीच वाट दिसली नाही. वाट असली तरी कदाचित सुळक्याच्या दरीकडच्या बाजूने असावी. गडावर असलेलं मधमाशांचे पोळे आणि त्यांचा धोका पाहता सुळक्यावर चढाई करण्याची वाट बंद केली गेली असावी.
कर्नाळा गड तास बराच विस्तीर्ण आहे गड फिरायला एक तास पुरेसा आहे पण गडावरील वातावरण पाहता तिथून पाय काढावासा वाटतच नाही. गडावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना आपण दुर्बीण नाही आणली याची खंत वाटली. वरून दिसणारा मुंबई - गोआ राष्ट्रीय महामार्ग लक्ष वेधून घेतो. आपण इतक्या वर पोचलो असा विचार करून विस्फारलेले बायकोचे डोळे पाहून फार मजा वाटली.
शासनाने एक माहितीपर फलक सुद्धा गडावर लावला आहे, तो प्रत्येकाने वाचावा असा आहे. थोडावेळ आजूबाजूचा परिसर न्याहाळत आणि भरपूर फोटो काढून परतीच्या वाटेल लागलो तेव्हा घड्याळात १२ वाजले होते.
 उतरताना जास्त थकवा जाणवला नाही, अगदी पाऊण तासातच आम्ही पुन्हा पायथ्यापाशी असलेल्या प्रवेश द्वाराजवळ पोहचलो. भूक तरी इतकी लागली नव्हती म्हणून घरी जाऊनच जेऊया असा निर्णय झाला, त्याआधी थंडगार लिंबू पाणी पोटात ढकलले आणि पिंजऱ्यात ठेवलेले पशु पक्षी थोडावेळ न्याहाळत राहिलो. लहान मुलांसाठी तर हा छोटा प्राणी संग्रहालय फारच उत्तम आहे.
पुन्हा रिक्षा पकडून पनवेल ला घरी आलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते. मनात विचार आला, इतक्या लवकर आणि आरामात कुठलाच ट्रेक झाला नव्हता. माझ्यासाठी म्हणाल तर कर्नाळा ट्रेक हा अगदीच सोपा होता पण तरीही प्रत्येक भटकंतीचे आपले असे वेगळे काहीतरी असते, तसच कर्नाळ्याच्या बाबतीत सुद्धा आहे. इथला निसर्ग, पशुपक्षी संपूर्ण ट्रेक दरम्यान आपली साथ देत असतात. इथली थंडगार हवा आपल्याला अजिबात थकवा जाणवू देत नाही. संपूर्ण ट्रेक दरम्यान बरीचशी मंडळी आपल्या बायका मुलांसोबत आली होती,  यावरून लक्षात येते कि हा परिसर आपल्या परिवार आणि मित्रांसोबत फिरायला किती छान असेल.



कर्नाळा पक्षी अभयारण्यात कसे पोहचाल?
सर्वात सोप्पा रूट म्हणजे पनवेल स्टेशन वरून एसटी कवा टमटम करून जाणे. आजकाल यांचे पण भाव वाढल्याने स्वतःची गाडी असणे उत्तम.

काय पाहाल?
१. पक्षी अभयारण्यातले पक्षी .
२.छोटा प्राणिसंग्रहालय
३. कर्नाळा किल्ल्यावर जाणारी नयनरम्य वाट.
४. किल्ल्याजवळील कर्नाई देवीचे छोटेसे मंदिर आणि पुरातन वीरगळ.
५. किल्ल्याचा दरवाजा जरूर निरखून पहा.
६. किल्ल्यावरील पाण्याचे टाके
७. किल्ला परिसर.

कृपया हे करू नका.
आपले गडकिल्ले हे महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून जिंकलेले आहेत, तरी येथे कुठल्याही प्रकारची घाण किंवा कचरा करू नये. प्लास्टिक च्या बॉटल किंवा चिप्स, वेफरचे कागद इतरत्र फेकून देऊ नका. कचरा दिसल्यास कृपया उचलून साफ करा. हा आपला वारसा आहे आणि त्याला टिकवणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. इथे आपण निसर्गाची किमया पाहायला येतो आणि त्याचा आनंद लुटायला येतो. कृपया कर्कश आवाजातील भोंगे वाजवून इथली शांतता भंग करू नका.

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय!


  

Comments

Popular posts from this blog

कोंडाणे ते राजमाची: उन्हाळ्यातील एक अविस्मरणीय भटकंती

  खूप दिवसांपासून एखादा ट्रेक करण्याचा विचार मनात घोळत होता. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण आडवे येत होते आणि ट्रेकचा बेत पुढे ढकलला जात होता. त्यातच महाराष्ट्रात सध्या प्रचंड उष्णतेची लाट सुरू असल्यामुळे उन्हाळ्यात ट्रेक करायचा की नाही याबाबत मनात थोडी भीतीही होती. कडक ऊन, उष्माघाताचा धोका आणि शरीराची होणारी दमछाक यामुळे ट्रेकिंगपासून दूर राहण्याचाच विचार सुरू होता.  तरीही यावेळी शनिवार-रविवार वाया जाऊ द्यायचा नाही, असे ठरवले. काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या सान्निध्यात वेळ घालवायचा हा निर्धार केला. इंटरनेटवर थोडे संशोधन केल्यानंतर कर्जतजवळील कोंडाणे बौद्ध लेण्यांमार्गे राजमाची किल्ला ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. पनवेल पासून जवळच असल्याने मला हा ट्रेक सोयीचा वाटला. या ट्रेकसाठी अनेक मित्रांना विचारणा केली. मात्र प्रचंड उकाड्यामुळे कोणीही तयार नव्हते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही काही पोस्ट करून ट्रेकसाठी सोबती शोधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही जणांनी उत्सुकता दाखवली, पण ट्रेकच्या आदल्या दिवशी किंवा शेवटच्या क्षणी सर्वांनी माघार घेतली. अखेरीस ...

अविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर

घरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही. गोरखगड चा ट्रेक झाल्यानंतर परत ओढ लागली ती येणाऱ्या ट्रेकिंग सीजन ची. आकाश तर नेहमी रेड़ीच असतो  त्याचा फोन आला आला कि समजायचं कि ट्रेक प्लॅन रेडी आहे बॅग तयार ठेवा. शुक्रवार चा दिवस होता, शनिवार रविवार काय करायचे याच्याच विचारात होतो. ऑफिसच्या मित्रांसोबत सिनेमा वैगेरे चा प्लॅन होता पण मनापासून जावेसे वाटतच नव्हते. तसा त्यादिवशी दुपारी लंच टेबल वर आकाश चा कॉल आला. आकाश ने सांगितले कि कॅम्पिंग चा प्लॅन आहे शनिवार रविवार मस्त कॅम्पिंग करू. लागलीच  ऑफिस च्या मित्रांना सॉरी बोलून टाकले. आता घरातून परवानगी मिळवण्यासाठी आई चे दोन शब्द ऐकायचे बाकी होते. एक तास आई चे भाषण ऐकल्यावर तिनेच ट्रेक साठी लागणारी शिदोरी बांध...